रघुनाथराव यांच्या काळात देवस्थानचे ऐश्वर्य परमोच्च राहिले होते. व्यवस्थेकरिता चाळीस नौकर सदैव तत्पर असत. आरतीच्यावेळी नगारा, झांज, सनई इ. वाद्ये वाजत असत. इतर नैमित्तिक प्रसंगी वाद्यांचा गजर असे. विशेष प्रसंगी व सणाचे दिवशी अलंकार पूजा होई. सोन्यामोत्याचे शंभराहून अधिक दागिने श्री लक्ष्मी-नृसिंहास लेववीत असत. भरजरी रेशमी वस्त्रे अप्पोर्व शोभा देत. पहाटे काकड आरतीपासून, पाच वेळा पूजा असे. पंचामृत पूजेच्या वेळी गायन चाले. दुपारी माध्यान्ह पूजेनंतर महानैवेद्य होई. वेदपठण, सूक्ते, पवमान इ. म्हटली जात. तिसर्याज प्रहरी पुराण चाले. रात्री शेजआरती व नंतर नृसिंहचंपू पठण चाले. देवालयातील सर्व लहान मोठी उपकरणे चांदीची होती. भालदार, चवर्याआ व मोरचेल, अबदागिर्या धारण करणारे मिरवणुनीत हजर असत. ब्रम्हवृंदांचा मत्रघोष मिरवणुकीत चाले. असे श्रींचे ऐश्वर्य डोळ्यांना दिपवणारे होते. श्री. विंचूरकरांच्या आगमनाप्रसंगी तर एखादा महोत्सवच ग्रामस्थांना अनुभविण्यास मिळत असे. छोटी नरसिंहपूर नगरी लोकांच्या कौतुकाचा विषय बनली होती.गावात विविध व्यवसायी लोकांना भरपुर काम मिळे. बाजारपेठ समृद्ध होती. शिक्षणाची चांगली सोय होती. वेदपाठशाळा होती. गावात विद्वान ब्रम्हवृंदाचे वास्तव्य होते. गावाभोवती दाट वृक्षराजी आणि नद्यांचा मनोहारी संगम यामुळे विविध पक्ष्यांचे कूंजन नित्य चाले. मोर, पोपट यांची संख्या खूपच होती. सराफ आणि सोनार यांचा व्यवसाय येथे उत्तम प्रकारे चालत असे. नद्यांना भरपुर पाणी असल्याने त्यावर होड्या डौलाने चालत. शेती उत्तम असल्याने धनधान्याची समृद्धी होती.

नवी बांधकामे नित्य उभी राहात असल्याने कारगिरांना भरपुर काम असे. गावात अन्नछत्र मिरजेचे पटवर्धन यांच्या वतीने चाले.; त्यामुळे अतिथींना चिंता नसे. श्री नरहरीच्या छायेत या सुबत्तेचा लाभ सर्व जातीजमातींना उपभोगण्यस मिळत असे. वैदिक कृष्णाचार्य दंडवते, नागेश्वरराव डिंगरे, मामा डोळे, अच्युतकाका वांकर, यांच्या सारख्या कर्तबगार मंडळीमुळे नृसिंहभक्ती हा या सर्व परिसराचा केंद्रबिंदू राहिला.